देशात गेले काही दिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. असे असताना मात्र, पुणे महानगरपालिकेच्या एकाही रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या दवाखान्यातील लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. यासोबतच जळगावमध्येही कोरोना प्रतिबंधक लसीकरण बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
मार्च महिन्यापासून पासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. मात्र, असे असताना पुण्यात लसीकरण बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे. पुणे महानगर पालिकेच्या रुग्णालयात सध्या लसी उपलब्ध नसल्यामुळे हे लसीकरण थांबवले आहे. पुढील 8 दिवसांमध्ये लस उपलब्ध होणार असून तेव्हा पुन्हा लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मनपाने दिलेल्या माहितीनुसार पुण्यात परिस्थीती नियंत्रणात आहे. मात्र, प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिली आहे.
या रुग्णालयात लसींचा साठा नाही
पुण्यातील नायडू, कमला नेहरू, ससून हॉस्पिटल, सुतार दवाखाना यासारखा महानगर पालिकेच्या रुग्णालयात लसीचा साठा उपलब्ध नाही.
मुंबई, नाशिक शहरात कोरोना प्रतिबंधंक लसीकरण सुरू असून कोरोनाचे रुग्ण वाढू नये, यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. साताऱ्यात कोरोनाचा दोन रुग्ण दगावल्याने जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून मास्क वापर करावे असे सांगण्यात आले.
साताऱ्यात सॅनिटायझरचा वापर करा – प्रशासन
इन्फ्लुएन्झा आणि कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांनी जिल्हा प्रशासनाला उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य केला आहे.
आठवडी बाजार, एसटी स्टॅंड, यात्रा, मेळावे, लग्न समारंभ, तसेच मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात, अशा ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर राखून सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले आहे.