पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने उत्कृष्ट कामगिरी करत एकूण आठ पदके आपल्या खात्यात जमा केली आहेत. पद्मजा बोरकर आणि ऋषिकेश मोरे यांनी शानदार प्रदर्शन करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
बालेवाडी स्टेडियममध्ये बुडो असोसिएशन ऑफ पुणे व महाराष्ट्र राज्य बुडो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 20 जिल्ह्यातील मुलामुलींच्या संघांनी सहभाग नोंदवला होता. छत्रपती संभाजीनगर संघाचे व्यवस्थापक म्हणून अदनान शेख आणि साक्षी जाधव यांनी काम पाहिले.
या सर्व खेळाडूंना महेंद्रराज लॉयन्स स्पोर्ट्स अँड करिअर अकादमीचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक महेंद्र रंगारी व आर. जे. स्पोर्ट्स अकादमीचे मुख्य प्रशिक्षक रहीम जमादार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. पदक विजेत्या खेळाडूंचे राज्य संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले, टेक्निकल डायरेक्टर सचिन पट्टेकर, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय अध्यक्ष तथा बुडो मार्शल आर्ट्सचे जिल्हा सचिव रफिक जमादार, संजय जिनवाल, रवींद्र ढिवरे, फिरोज शेख, डॉ. मकरंद जोशी, अॅड. गोपाल पांडे, आदींनी अभिनंदन केले.
विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे
सुवर्णपदक – पद्मजा बोरकर, ऋषिकेश मोरे. रौप्यपदक – यश भालेराव, अमान शेख, समर्थ जोरले. कांस्यपदक – परिधी साबने, ओम तोंदे, वंश गावंडे.
अपेक्षित यश मिळाले नाही
आमच्या खेळाडूंनी चांगली तयारी केली होती, मात्र या वेळी अपेक्षित यश मिळाले नाही. पुढच्या वेळी निश्चित चांगले प्रदर्शन करतील. या स्पर्धेतून खेळाडूंना खुप गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. त्या त्यांना फायदा होईल, अशी प्रतिक्रिया प्रशिक्षक रहीम जमादार यांनी दिली.