सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्मग्रंथांची पुन्हा समीक्षा करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, ‘आपल्याकडे पूर्वी ग्रंथ नव्हते. आपला धर्म मौखिक परंपरेतून चालत आला. पुढे धर्मग्रंथांची सरमिसळ झाली आणि काही स्वार्थी लोकांनी त्यात काहीतरी टाकले जे चुकीचे आहे. त्यामुळे त्या ग्रंथ व परंपरांच्या ज्ञानाची पुन्हा एकदा समीक्षा करणे आवश्यक आहे.’
नागपूरच्या कान्होलीबारामध्ये आर्यभट्ट अॅस्ट्रोनॉमी पार्कच्या उद्घाटनानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे विधान केले आहे.
आपल्याकडे जगभरातील समस्यांवर तोडगा
भागवत म्हणाले – “आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन होता, त्या आधारावर आपली वाटचाल सुरू होती. पण परदेशी आक्रमणामुळे आपली व्यवस्था नष्ट झाली. आपल्या ज्ञानाची परंपरा खंडीत झाली. आपण खूप अस्थिर झालो. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला आपल्या परंपरेत काय आहे याचे किमान काही मूलभूत ज्ञान असले पाहिजे, जे शिक्षण व्यवस्थेद्वारे तसेच लोकांमधील सामान्य संवादाद्वारे प्राप्त केले जाऊ शकते.’
सरसंघचालक असेही म्हणाले की, ‘भारतीयांनी त्यांच्या पारंपारिक ज्ञानाचा आधार शोधला व विद्यमान स्थितीसाठी काय स्वीकार्य आहे हे शोधून काढले, तर “जगातील अनेक समस्या आपल्या उपायांनी सोडवता येतील”.
नव्या अभ्यासक्रमात अनेक नव्या गोष्टींचा समावेश
मोहन भागवत म्हणाले की, ‘भारताच्या पारंपारिक ज्ञानाचा आधार खूप मोठा आहे. आपली काही प्राचीन पुस्तके गहाळ झाली आहेत. काही प्रकरणांत स्वार्थी लोकांनी त्यात चुकीचा दृष्टीकोन मांडला आहे. पण आता नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमात पूर्वी अस्तित्वात नसणाऱ्या अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.’