राज्यातील शासकीय महाविद्यालये, संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन तसेच कला महाविद्यालये यामध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये म्हणून रिक्त पदांवर तासिका तत्त्वावर अध्यापक यांची नियुक्ती करण्यात येत असून तासिका अशा अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
या निर्णयानुसार कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी ६२५ रुपयांवरून एक हजार रुपये प्रतितास आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ७५० रुपयांवरून एक हजार रुपये प्रतितास मानधन मिळेल. शिक्षणशास्त्र , शारीरिक शिक्षण, विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमासाठी ७५० रुपयांवरून एक हजार रुपये प्रति तास मानधन मिळेल. उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान यासाठी एक हजार रुपयांवरून १ हजार ५०० प्रति तास मानधन मिळेल. पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मानधन दर ६०० रुपयांवरून एक हजार रुपये प्रति तास असे करण्यात आले आहे. तर पदविका अभ्याक्रमांसाठी मानधन दर ५०० रुपयांवरून ८०० रुपये प्रति तास मानधन असेल. उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित, अनुभव संपन्न, ज्येष्ठ व्यवस्थापक यांचे व्याख्यान मानधन दर ७५० रुपयांवरून १ हजार ५०० प्रति तास तर कला शिक्षण पदविका तसेच पदवी/पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम मानधन दर ६२५ रुपयांवरून एक हजार प्रति तासाप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे, असे पाटील यांनी निवेदनाद्वारे सांगितले.
२०८८ सहायक प्राध्यापकांची लवकरच भरती
राज्यात २०८८ सहायक प्राध्यापक पदाच्या पद भरतीवरील निर्बंध उठवण्यात आले आहेत. १०० टक्के होणारी प्राचार्य संवर्गातील पदे भरण्यासही मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या उर्वरित १२१ ग्रंथपाल, १०२ शारीरिक शिक्षक अशी एकूण २२३ पदे भरण्यास स्थगिती शिथिल करण्यास वित्त विभागास विनंती करण्यास आली होती. या प्रस्तावालादेखील मान्यता प्राप्त झाली आहे.