शिवसेनेचा भगवा रंग का हटवला?; शिवसैनिकांसह नेटकरी नाराज

मुंबई :  लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. या लोकसभेला अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. यात लक्ष खेचून घेणारी म्हणजे शिवसेना आणि भाजपची युती. कारण गेल्या ५ वर्षांत शिवसेनेनं भाजपविषयी नेहमीच गरळ ओकली. स्वबळावर लढण्याचा नारा दिला. मात्र हे सर्व बाजूला सारत त्यांनी भाजपशी गळाभेट केली. त्यानंतर मात्र शिवसेना आता भाजपची री ओढत नाहीएना असं वाटू लागले आहे. कारण शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवरील प्रोफाईल बदलण्यात आले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात शिवसेनेनं या प्रोफाईलमधील फोटोत मोठा बदल केला आहे.

शिवसेनेच्या या नव्या फोटोत धनुष्यबाणाच्या पाठिमागे असणारा भगवा रंगच गायब करण्यात आला आहे. भगवा रंगाऐवजी तेथे पांढरा रंग वापरण्यात आला आहे. शिवसेने बुधवारी हा प्रोफाईल बदलला. त्यानंतर शिवसैनिकांनी आणि नेटकऱ्यांनी नारजी व्यक्त केली आहे. कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला हिंदुत्व म्हणजे भगवा अशी ओळख दिली होती. तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आपल्या भाषणात नेहमी दिल्लीत भगवा फडकवण्याविषयी बोलत असतात. मात्र शिवसेनेच्या प्रोफाईवरून हा भगवा रंगच गायब झाल्याचे दिसत आहे.

पूर्वीच्या फोटोत भगवा रंग आणि त्यावर काळ्या रंगात धनुष्यबाण दिसत होता. मात्र यात धनुष्यबाण काळाच आहे, पण भगव्याऐवजी पांढरा रंग वापरला गेलाय. त्यामुळे शिवसैनिकांनी आणि नेटकऱ्यांनी यावर प्रश्न करत नाराजी व्यक्त केली आहे. फोटोतील भगवा रंग कुठे गेला. हा बदल का केला, असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे.

भाजपनेही लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर जम्मू-काश्मीरमधीप उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपच्या लोगोत बदल केला होता. या फोटोत कमळाचे फुल पांढऱ्या रंगात होते, तर मागे नेहमी भगवा असणारा रंग हिरवा करण्यात आला होता. तेव्हाही भाजप भक्तांनी यावर नाराजी व्यक्त करत सवाल केले होते.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment