भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवराय !!

छत्रपती शिवाजी महाराज आणि समुद्राचा काय संबंध ?? असं कुणीतरी चिल्लर माणूस काही दिवसांपूर्वी बोलला होता, त्या माणसाला आणि त्याच्या भक्तांना हा लेख वाचून अक्कल येईल.

 

छत्रपती शिवरायांच्या काळात उत्तरेतील मोगल सत्तेने नौदलाकडे व समुद्री सीमांकडे दुर्लक्षच केले होते, कारण मुगल व त्यांचे शत्रू हे जमिनीवरून, उत्तरेकडूनच येत होते. मुघलांनी देशातल्या सर्व लढाया ह्या जमिनीवरच लढल्या व जिंकल्या होत्या त्यामुळे त्यांना नौदल उभारायचं काहीही अप्रूप नव्हतं ..

 

मात्र महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर पोर्तुगीज उतरले आणि हे सगळंच बदललं.. पोर्तुगीज नौदल व नाविक तंत्रात पारंगत होते, नौदलाच्या जोरावरच हा आपल्या तीन जिल्ह्यांएवढा देश जगभरात आपल्या वसाहती कायम राखून होता. नौदलाच्या जोरावर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी दादागिरी करायला सुरुवात केली. व्यापारी मार्गांवर पोर्तुगीजांच्या मंजुरीशिवाय एकही जहाज जात येत नव्हतं हे लक्षात घेऊन शिवरायांनी १६५४  साली कल्याणच्या किनाऱ्यावर मराठी आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. महाराजांनी मराठी आरमाराची स्थापना केली तेव्हा ते भारतातलं पहिलं नौदल होतं. शिवरायांच्या नौदलात दोन लढाऊ ताफे होते, मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वातला एक ताफा तर दौलत खान यांच्या नेतृत्वात दुसरा ताफा होता. पोर्तुगीजांच्या नौदल अनुभवाचा फायदा घेण्यासाठी रुई लाइटाव व्हीगास यालासुद्धा एका लढाऊ नौदल पथकाचा प्रमुख नेमण्यात आले होते.

(c) British Library; Supplied by The Public Catalogue Foundation

१६६४ सालच्या सुरतवरील चढाईत महाराजांनी सैन्य व नौदल सोबत वापरलं, ही भारताच्या इतिहासातील अभुतपूर्व घटना होती, यानंतर महाराजांनी ब्रिटिश व पोर्तुगीजांच्या नाकावर टिच्चून खांदेरी बेट ताब्यात घेतलं. १६७४ साली महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा मराठा नौदलात ५००० नौसैनिक व ५७  लढाऊ जहाजं होती. महाराजांच्या या नाविक सामर्थ्याचा घाबरून पोर्तुगीजांनी राज्याभिषेकाला प्रतिनिधी तर पाठवलाच पण मराठ्यांचे सामुद्रिक वर्चस्व मान्य करून भेटवस्तू व खलिते देखील पाठवले. कारवारच्या लढाईत मराठी आरमार उतरलं तेव्हा ८५  गलबत व ३ गुराबा मराठी नौदलाकडे होत्या.

मराठी सैन्याकडे तोफा लावलेली जहाजे सुद्धा होती त्यांना पाल असे म्हटले जात असे. मराठी जहाजे ही वजनाने हलकी व वाऱ्याच्या जोरावर पळणारी असत, किनाऱ्या जवळ असणाऱ्या खडकांची अचूक माहिती मराठी सैनिकांना असे, त्यामुळे ब्रिटिश व पोर्तुगीज जहाजे जिथे फसून बसायची तिथूनच मराठी गलबते मात्र वेगाने निघून यायची. ब्रिटिशांच्या जहाजांना एका बाजूने तोफा असत मराठी जहाजे मात्र fraw mounted अर्थात समोरून तोफा असलेली होती, त्यामुळे हल्ला करायला कमीत कमी वेळ लागत असे. मराठ्यांच्या पायावर लोळण घेऊन पोर्तुगीजांनी समुद्रावरचे मराठी वर्चस्व मान्य केले होते मात्र सिद्दी लोकांनी मुघलांशी मैत्रीचा करार केला होता. त्याला अनुसरून मुघलांविरुद्ध लढाईत पोर्तुगीजांनी मराठ्यांची साथ दिली होती. मराठा नौदलाचा दरारा असा होता की मराठा साम्राज्याच्या समुद्री सीमेतून जाताना त्याकाळी चौथ (एक प्रकारचा कर) द्यावी लागे.

सेनासरखेल कान्होजी आंग्रे

कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली मराठी नौदलाने नवीन उंची गाठली होती. खांदेरी बेटावर वारंवार हल्ले करूनही ब्रिटिशांना, सिद्दी, पोर्तुगीजाना खांदेरी जिंकता आलेलं नव्हतं शिवाय कुलाबा, अलिबाग ही नवीन नौदलाची ठाणी वसवल्या गेली होती.

कान्होजींनी वारंवार हल्ले करून ब्रिटिश नौदलाला जेरीस आणलं होतं. मराठा हद्दीत आलेल्या ब्रिटिशांच्या लढाऊ नौकेवर हल्ला केल्यावर एकदा तर ब्रिटिशांचा मुंबईचा गव्हर्नर व त्याचा संपूर्ण ताफच आंग्रेंच्या हाती लागला मग जबर खंडणी बसवून त्यांची सुटका झाली.

मराठा आरमाराचा अंत कसा झाला ?

कान्होजी आंग्रेंचे पुत्र तुळाजी आंग्रे यांनी पेशवा बाजीरावाचे प्रभुत्व मानायला नकार दिला होता. प्रत्युत्तरादाखल पेशवा बाजीराव व इंग्रजांनी मिळून केलेल्या संयुक्त कारवाईत मराठी नौदल पूर्णपणे ध्वस्त झाले. नंतर सरखेल आनंदराव धूळप यांच्या नेतृत्वात मराठा आरमार पुन्हा उभे करण्याचे प्रयत्न झाले मात्र त्यात यश आले नाही.

आज (४ डिसेंबर) भारतीय नौदलाच्या सन्मानार्थ नौदल दिन साजरा केला जातो, १९७१ च्या युद्धात भारतीय नौदलाने कराची बंदरावर केलेल्या धडाकेबाज हल्ल्याने पाकिस्तानी नौदल गलितगात्र झाले होते त्या कारवाईच्या स्मृत्यर्थ हा दिवस नौदल दिन म्हणून मानण्यात येतो मात्र आधुनिक इतिहासातल्या पराक्रमाच्या झगमगाटात आपण आपला प्राचीन इतिहासही विसरायला नको.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment