खरं-खुरं सेक्रेड गेम्स : माणसं मारून त्याला सतयुग आणायचं होतं

आता सेक्रेड गेम्स तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल, त्यातल्या गुरुजींचा आशीर्वाद गायतोंडेला कसा मिळतो हे सुद्धा बघितलं असेलच पण गुरुजी सारखा येड्या डोक्याचा माणूस रिअल लाईफ मध्ये अस्तित्वात असेल असं तुम्हाला कधीच वाटलं नसेल ..

गुरुजीची थिअरी अशी आहे की जगात खूप पाप झालंय.. म्हणून जग नष्ट करावं लागेल आणि मग नष्ट झालेल्या जगात सत्ययुग येईल, त्या सत्ययुगात गुरुजीची सकाळ संध्याकाळ गोची घेणारी गँगच उरलेली असेल, आणि मग ते त्या जगावर राज्य करतील. कलियुग संपून सत्ययुग येण्यासाठी कलियुग संपवणे गरजेचं आहे त्यासाठी एक अणुबॉम्ब फोडायचा मग सगळे देश एकमेकांवर हल्ले करून जग संपवणार.

तर असाच एक गुरुजी जपान मध्ये होता, शोको असाहारा त्याचं नाव, हिंदू आणि बौद्ध धर्मातल्या काही संकल्पना चुकीच्या पद्धतीने वापरून त्याने आपल्या पंथाचं एक वेगळं तत्वज्ञान बनवलं होतं, ओम या पवित्र शब्दाला केंद्रस्थानी वापरून त्याने आपल्या पंथाला ओम सिनारी क्यो असं नाव दिलं होतं, सिनारी क्यो म्हणजे ‘सर्वोच्च सत्य’.

एक युग संपून दुसरं सुरू होतं ही संकल्पना शोको असाहाराने बायबल मधून उचलली होती, त्याने स्वतःला जपानचा ख्रिस्त परमात्मा ही जाहीर करून टाकलं होतं आणि सगळं जग नष्ट केल्यावर येणाऱ्या सत्ययुगात तो जगाचा राजा बनणार होता.

20 मार्च 1995 रोजी ओम सिनारी क्यो ने टोकियो शहरातील 5 सबवे ट्रेन्स मध्ये सरीन नावाचा विषारी गॅस सोडला, या मध्ये तेरा जण मृत्युमुखी पडले आणि जवळजवळ 1000 लोकांच्या डोळ्यांवर परिणाम झाला, हा हल्ला म्हणजे सिनारी क्यो ला भविष्यात काय करायचं होतं त्याचा एक ट्रेलरच होता. सिनारी क्यो नावाचा पंथ आतंकवादी हल्ले करू शकतो अशा खबरा पोलिसांना आधीच मिळालेल्या होत्या, त्या दृष्टीने छापे टाकायची योजनाही पोलिसांनी आखली होती. हल्ला झाल्यानंतर जे छापे टाकण्यात आले त्यात या पंथाकडे तब्बल चाळीस लाख लोकांचा जीव घेऊ शकेल इतक्या क्षमतेचे सरीन गॅसचे साठे सापडले होते.

या हल्ल्यांखेरीज इतरही छोटे मोठे हल्ले ओम सिनारी क्यो ने केले होते, त्यांच्या विरोधात निर्णय देणाऱ्या जज वर मार्श गॅस ने त्यांनी हल्ला चढवला होता, शोको असाहारा आपल्या शरीरात ईश्वरी शक्ती असल्याचा दावा करायचा, त्याचा हा दावा खोटा असून ओम सिनारी क्यो आपल्या भक्तांना डांबून ठेवून पैसे उकळत असल्याचा खुलासा त्सुत्सुमी साकामोटो नावाच्या एका वकिलाने केला होता. त्यामुळे न्यायालयाने असाहाराला कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्याचा राग मनात ठेवून सिनारी क्योच्या कार्यकर्त्यांनी साकामोटो, त्याची पत्नी आणि त्यांच्या चौदा महिन्यांच्या मुलाचा खून करून त्यांचे मृतदेह तीन वेगवेगळ्या राज्यात लपवले होते.

सेक्रेड गेम्स मधल्या गोजी (की गोची) सारखंच ओम सिनारी क्यो सुद्धा आपल्या साधकांना ताब्यात ठेवायला ड्रग्सचा वापर करायची. त्यांच्या आश्रमांवर घातलेल्या छाप्यात पोलिसांना एलएसडी आणि अँफीटामाईनचे बरेच मोठे साठे आढळले होते.

कोर्टात ओम सिनारी क्योचे हे सगळे कारनामे गेल्यावर शोको असाहारा आणि त्याच्या सहा साधकांवर 27 जणांच्या खुनाचे आरोप लागले, ओम सिनारी क्योच्या बऱ्याच साधकांनी विरोधात आणि समर्थनार्थही साक्ष दिली, अखेर आरोप खरे ठरल्यावर 2018 मध्ये शोको आणी त्याच्या सहा साथीदारांना फाशीवर लटकावल्या गेलं.

ओम सीनरी क्यो च्या सर्वच इमारतींवर नंतर जपानी पोलिसांनी छापे घातले, आज हा पंथ संपत आला तरी त्यांचे 1650 फॉलोवर्स अजूनही आलेफ आणि हीकारि नो वा या दोन नावांनी अजूनही शोकोचे विचार जपण्याचं काम करतात. हीकारी नो वा चे साधक तर उघडपणे अजूनही शोको असाहाराचे फोटो लावतात.
जपानी लष्कराची एक तुकडी अजूनही आलेफ च्या मुख्यालयासमोर तैनात आहे.


ओम सिनारी क्यो चा झेंडा पाहून तुम्हाला सेक्रेड गेम्स मधलं एखादं चिन्ह आठवतंय का ? हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा.

.

Leave a Comment