नागेश्वररावांना सर्वोच्च न्यायालयाची चपराक….

न्यायालयाच्या आदेशांचा अवमान केल्याप्रकरणी नागेश्वर राव यांना आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी ‘एक दिवस कोर्टात बसून राहण्याची’ शिक्षा सुनावली आहे, त्याचबरोबर, १ लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.

सीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर सीबीआय प्रमुखपदी एम. नागेश्वरराव यांची नियुक्ती करण्यात आली होती.
नागेश्वरराव यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.
या बदल्यांमध्ये संयुक्त संचालक ए. के. शर्मा यांचा देखील समावेश होता.

शर्मा यांच्या बदली प्रकरणात एम. नागेश्वर राव यांच्यासोबतच एस. भूसारण यांना देखील दोषी ठरवण्यात आले आहे. याचबरोबर, न्यायालयाने शर्मा यांच्या बदली प्रकरणात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती देखील मागवली आहे.

ए के. शर्मा हे सीबीआय चे संयुक्त संचालक म्हणून काम पाहताना बिहारमधील सरकारी आश्रयस्थानामध्ये मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारासंबंधीच्या केसचा तपास लावत होते. शर्मा यांची बदली करू नये, असे आदेश न्यायालयाने सीबीआय ला ३१ ऑक्टोबर २०१८ व २८ नोव्हेंबर २०१८ असे दोनदा देवून देखील शर्मा यांची बदली करण्यात आली होती. शर्मा यांच्या बदलीला अभियोजन संचालक एस. भासूरण यांनी देखील मान्यता दिलेली होती. बदलीनंतर शर्मा यांची नेमणूक केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त संचालक म्हणून करण्यात आली.
देशाच्या एका सर्वोच्च संस्थेचा प्रमुख राहिलेल्या अधिकाऱ्याला अशी शिक्षा देताना सर्वोच्च न्यायालाच्या आदेशांचा आदर राखला जावा व चुकांबद्दल जरब बसावा, हा उद्देश असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

बिहारमधील सरकारी आश्रयगृहांमध्ये मुलींवर होणारा लैंगिक अत्याचार हा २०१७ मध्ये TISS च्या एका अहवालातून सामोर आला होता.

न्यायालयाने आदेश देवून देखील ए. के शर्मा यांची बदली का करण्यात आली ? नागेश्वरराव यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या कोणाच्या सांगण्यावरून केल्या? असे अनेक प्रश्न या प्रकरणात उपस्थित होत आहे.

या घटनेबद्दल असीम सरोदे यांचे मत घेतले असता, त्यांनी ‘यंत्रणेतील काही मोठे अधिकारी हे राजकीय पक्षांचं हित बघून काम करताना दिसतात. नागेश्वरराव यांची देखील भूमिका हि सुरुवातीपासून पक्षसापेक्ष राहिली असून, आज सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलेली हि शिक्षा म्हणजे महत्वाचा निर्णय आहे…याचबरोबर, देशाच्या सर्वोच्च संस्थांपैकी एक असणाऱ्या या चौकशी यंत्रणेतील प्रमुख पदी राहिलेल्या व्यक्तीला झालेली हि शिक्षा राजकीय कीड कितपत पोहोचल्याचे स्पष्ट करत आहे व हि सर्वसामान्य जनतेसाठी चिंतेची बाब असून याच्या पुनर्प्रस्थापितीकरणासाठी मोठे रचनात्मक काम उभारले पाहिजे’, असे मत व्यक्त केले.

.

Leave a Comment