.. आय एम अ ट्रोल

भूमिका

स्वाती चतुर्वेदींचं ‘आय़ एम अ ट्रोल’ हे पुस्तक वाचलं आणि जे केवळ जाणवत होतं, ओझरतं माहीत होतं त्याची ठळक खात्री पटली. पक्षाच्या प्रचारासाठी किंवा दुसऱ्या पक्षाला खिजवण्यासाठी, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सोशल मिडिया आणि निगडित तंत्रज्ञानाची मदत घेऊन प्रचाराचे राक्षसी यंत्र चालवणे हा आजच्या युगाचा राजकीय फंडा बनत चालला आहे याची साक्ष काही प्रत्यक्ष पुराव्यांसकट देणारे हे पुस्तक आहे. भारतापुरते मर्यादित आणि त्यातही मुख्यत्वे भाजपपुरते मर्यादित अवकाश ठेवून पत्रकार लेखिकेने हा एक शोधअभ्यास या पुस्तकामार्फत मांडला आहे. लेखिकेला स्वतःला प्रत्यक्ष त्रास झाल्यानंतर तिने या विषयाच्या मागे जायचे ठरवले आणि शोधपत्रकारितेच्या शैलीनेच ते लिहिले आहे.
भारताच्या राजकीय प्रचाराच्या अवकाशात इतक्या प्रभावीपणे आधुनिक तंत्रज्ञानी वाटांचा वापर करून यश मिळवणारा पहिला पक्ष भाजप आणि त्यामागचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्यामुळे पुस्तक अर्थातच भाजपला टोकदारपणे रुतण्यासारखे झाले आहे.
२०१३ पासून मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे झेंडे लागले तेव्हापासून मी माझा विरोध नोंदवत आले आहे. फेसबुकवर आणि प्रत्यक्ष चर्चांमध्येही. त्यांचे पूर्वकर्तृत्व जाणून असल्यामुळेच हा मनुष्य पंतप्रधानपदाचा उमेदवारही असता कामा नये हेच मत होते. आज तीन वर्षे पूर्ण होत आली तेव्हाही ते मत बदललेले नाहीच, उलट अधिकच दृढावले आहे.
२०१३ साली फेसबुकवर लढायाच चालत या विषयावरून. त्या काळी माझी भिंत खुली होती. कुणीही येऊन भिंतीवर लिहू शकत असे. त्यात मोदीभक्तीचा विकार जडलेले अनेक लोक अत्यंत वाईट शब्द वापरून, निर्भर्त्सना करीत, वेडेवाकडे लिहीत. इनबॉक्समध्ये येऊन गलिच्छ लिहीत ते वेगळेच, पण खुल्या भिंतीवरही बेशरम शब्दांचा वापर असे. त्याच वेळी तिथे ट्वीटरवर ही लढाई इतक्या हिणकस पातळीवर आलेली आहे याची कल्पनाच नव्हती. कारण ट्वीटरचे अकाउंट उघडले असले तरीही ते माध्यम मला फारसे रुचले नव्हते आणि सातत्याने या माध्यमावर असायची शक्यताच नव्हती. फेसबुकवर जो दिसत होता त्याच्या दसपट अधिक द्वेषाचा प्रसार, शिवीगाळ, धमक्या ट्वीटरवर दिसत होत्या.
अलिकडेच मी एका पुरस्कार विजेत्या महिला पत्रकार नेहा दीक्षित यांच्या एका लेखासंबंधी लेख लिहिला. शिक्षणासाठी म्हणून आसामबाहेर नेलेल्या एकतीस मुलींच्या आईवडिलांना त्यांची काहीही खबरबात, पत्ता वगैरे माहिती नव्हती या विषयासंबंधी केलेला तो शोधवृत्तान्त होता. त्यासंबंधी लिहिले म्हणून मला पोलीसतक्रारी, कारवाई, वगैरेंची दहशत सोशलमिडियावरून घातली. अलिकडे तर एका बाईंच्या माध्यमातून मला दापोली-चिपळूणकडच्या प्रसिध्दीपराङ्मुख(!) इसमाच्या ‘कार्या’संबंधी निरोप पाठवण्यात आला. शहरी नक्षलवाद्यांना ते कसे सोडणार नाहीत वगैरे त्यात लिहिले होते. ते मोदीशहांशी थेट कनेक्टेड असून त्यांचा त्यांना पाठिंबा आहे वगैरेही लिहिले होते. ते स्वतःच्या कार्यक्रमाला एलआरओ- लिगल राइट्स ऑब्सर्वेटरी म्हणतात (ती जास्त लेफ्टिस्ट रिटॅलिएशन ऑर्जी वाटतेय)- आणि स्वतःला आय़र्न हॅन्ड म्हणवतात. आता या प्रकारचे ट्रोल्सही कार्यरत होतील. जे जे विरोधक आहेत त्यांना देशद्रोही, गोहत्या करणारे याचबरोबर नक्षलींचे थिंकटॅंक, लेफ्टिस्ट वगैरे ठरवून बाद करण्याचे तंत्र वापरात येण्याची शक्यता आहे. मी तर साम्यवाद आणि धर्मवाद दोन्हींच्याही विरोधात आहे. तरीही मला या धमक्या आल्या. खरोखरच्या साम्यवादी किंवा सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावरून वर्गलढ्याला सहानुभूती दाखवणाऱ्या कुणालाही तर हे संपवायलाच निघालेले दिसतात.
असल्या लोकांना पाठिंबा देणारे संघाचे, भाजपचे सुसंस्कृत प्रातःस्मरणीय धुरीण कसल्या वरवरच्या मुलाम्याने चमकत असतात हेच यावरून स्पष्ट होते
हा अनुवाद प्रकाशनासाठी जाताना ट्वीटरवरील एक संवाद कळला. भाजपाईं ट्रोल असलेली प्रीती गांधी नावाची व्यक्ती अरविंद केजरीवालांचा उल्लेख सतत केजरी केजरी असा करते. त्यावरून आम आदमी पक्षाच्या ट्रोलने तिला म्हटले. तू केजरीवालचा उल्लेख केजरी असा करतेस तसा तुझा उल्लेख Gandhiच्या इंग्रजी स्पेलिंगमधील शेवटची दोन अक्षरे काढून Gand असा करायला हवा. ही ट्रोल एक स्त्री आहे याची तमा ‘आप’च्या ट्रोलला नव्हती, कारण भाजपाई ट्रोल्स अतिशय गलिच्छ भाषा वापरतात मग आम्ही त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं तर काय बिघडलं असा सरळ सवाल आहे.
प्रथम मी या पुस्तकाबद्दल फेसबुकवर लिहिले तेव्हाही त्यावर आलेल्या कमेंट्समध्ये आता आपणही असेच केले पाहिजे, ट्रोलिंग आपणही करायला हवे असा मोदी विरोधकांचा सूर लागू लागला होता. आजघडीला भाजप आणि आप या दोन पक्षांचीच ट्रोलबाजी चालली आहे. पण फेसबुकवरच्या मराठी जगतात जात, शिवाजी, संभाजी आणि अशा अनेक विषयांबंबत ज्या गलिच्छ पातळीला जाऊन लिहिले जाताना पाहाते तेव्हा हे असले ट्रोलिंग ‘आपण’ही करू या असे म्हणणे म्हणजे आपण आपल्या हातांनी आपल्या सामाजिक भानाचा खात्मा करण्यासारखे आहे. आपल्या भंवतालात साक्षर आहेत पण संवेदनाशील नाही असे, शैलीदार लिहू शकतात पण संवेदनाशील नाही असे अनेक लोक आहेत. ट्रोलिंग हा एक ऑनलाइन हिंसाचारच आहे. या हिंसाचारात अशा लोकांना हिरीरीने भाग घ्यायला लावणारे पक्ष आपल्या तथाकथित थोर संस्कृतीचे आणखी काय नि किती वाटोळे करणार आहेत याचा विचार करून धस्स होते.
ट्रोल म्हणजे काय यासंबंधी थोडेसे. ट्रोल हे पात्र पाश्चात्य किंवा प्रामुख्याने उत्तर युरोपीय परीकथांमधून आलेले आहे. खादाड, क्रूर, मठ्ठ, राक्षसी ताकदीचे, आकाराचे ट्रोल्स रात्री शिकार, लुटालूट वगैरे कारभार करतात आणि सूर्य उगवताच गुहांमधून लपतात. प्रकाशापासून दूर जातात, कारण सूर्यकिरण अंगावर पडले तर त्यांचे दगडात रुपांतर होते. महायुध्द काळात ट्रॉलिंग या मासेमारी तंत्राचे आणि ट्रोल चे एकत्रीकरण झाले आणि शत्रूचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी भलतीच काही कारवाई करणे याला ट्रोलिंग म्हटले जाऊ लागले. या पात्राला सोशल मिडियावर कधी कसा संदर्भ प्राप्त झाला ते पाहाणंही मोठं मजेशीर ठरेल.

ऐंशीच्या दशकापासून हा शब्द इंटरनेट संदर्भात वापरला जाऊ लागला. एखाद्या ग्रुपवर कुणी नवखा आहे का ते पाहाण्यासाठी अगदी साधेसुधे प्रश्न टाकून नवखेपणा उघड करणे म्हणजे ट्रोलिंग करणे होते. अलिकडे जो संदर्भ आला आहे त्यानुसार डोके बाजूला ठेवून तोच तोच प्रतिवाद ठरवून करणे, आता पुरे म्हटलं तरीही वाद घालतच रहाणे, विरोधी मत असलेल्यांच्या भिंतींवर जाऊन आगखाऊ भाषा वापरून विरोधी मत असलेल्यांना त्रास देणे, बदनाम करणे, शिव्या घालणे- नको तो सोशल मिडिया असे करून सोडणे याला ट्रोलिंग म्हटले जाऊ लागले, इनबॉक्समधे जाऊन शिव्या देणे, धमक्या देणे, ट्वीट करताना नावे घेऊन बदनामी करणे, फोटोमॉर्फ करून ओंगळ लिहिणे हे सारे हळुहळू ट्रोलिंगमध्ये समाविष्ट झाले. व्यक्तिगत जीवनात, भिंतींवर, संवादांत असले काही झाले तर तो प्रकार त्रासदायक असला तरीही एकदा ती व्यक्ती ब्लॉक केली की काम होते. पण या पुस्तकात ज्या ट्रोलिंगबद्दल लिहिले आहे ते संघटित राजकीय गुन्हेगारी स्वरुपाच्या ट्रोलिंगबद्दल आहे. त्याचा व्यक्तिगत ट्रोलिंगशी संबंध नाही हे प्रथम लक्षात घ्यायला हवे. असले ट्रोल्स ही अनेकदा मूठभर खऱ्या माणसांनी चालवलेल्या हजारो बेनामी पात्रांची सोशल मिडियातली छद्मरुपे असतात. प्रत्येकाची झूल वेगळी. पण लिहिणे तेच. एखादा शब्द इकडेतिकडे करून तोच तोच प्रचार वाजवत रहाणे हे या ट्रोल्सचे काम. त्यामुळे व्यक्तिशः आपल्या आवडीने शिवीगाळ करणाऱ्या, प्रचारकी लोकांना आताच्या व्याख्येनुसार ट्रोल म्हणता येणार नाही.
जसे अनेक लोक आज सोशल मिडियावर लिहिताना शिवराळ, गलिच्छ भाषेत लिहितात,
या पुस्तकात केवळ राजकीय ट्रोलिंगचाच शोध घेतलेला आहे. संघ-भाजपाच्या सत्ताकांक्षी यशस्वी प्रयत्नांत फार मोठा भाग सोशल नेटवर्क वापरण्याच्या अकलेचा आणि कलेचा होता. त्यांच्या प्रचाराचे कारस्थान किती प्रकारे सत्य आहे हे या पुस्तकातून पुराव्यांसह, तपशीलवार कळते. सोशल मिडिया आणि न्यूज मिडिया यांची सरमिसळ कसकशी होत गेली आणि मोदी-भाजपच्या यशकथांचे असत्य भाबड्या लोकांच्या मनांवर कसे बिंबत गेले हे कळणे भयावह आहे. इतके सारे लोक बोलत आहेत, लिहीत आहेत म्हणजे हे सत्य असणारच असे अनेक लोकांना भाबडेपणाने वाटते. पूर्वी ‘छाप्यातनं आलं’ (वृत्तपत्रांत छापून प्रसिध्द झालं) की ते सत्यच असा एख गैरसमज होता- त्याचाच हा आधुनिक अवतार. मुख्य प्रवाहातील माध्यमे, वृत्तपत्रे वगळता काही दशकांपूर्वी ग्रामीण भागातल्या लंगोटी वृत्तपत्रंनी, नियतकालिकांनी जसे अपप्रचाराचे पैसे घेऊन दुकाने चालवली त्याचेच हे मोठे स्वरूप आहे.
‘असत्यमेव जयते’च्या या कारस्थानी धोरणातून या देशाची आणखी वाट लागायची नसेल तर या खेळाचे स्वरुप सर्वांनी ओळखले पाहिजे. फुटकळशा वादाच्या मुद्द्यांवर आपली ताकद न वाया घालवता देशाची खरी संस्कृती नष्ट करणाऱ्या या टेक्नोसॅवी मतिमंदांचा, जबर ताकदीच्या, मठ्ठ डोक्यांच्या, क्रूर, खुनशी ट्रोल्सचा हल्ला परतवला पाहिजे. हे भाजपाईं ट्रोल्स स्त्री पत्रकारांना बलात्काराच्या धमक्या देणे, पुरुष पत्रकारांच्या कुटुंबातील स्त्रियांवर बलात्कार करू अशा धमक्या देणे हे करतच असतात. पण खोट्या प्रचाराच्या साथीने एका विशिष्ट विचारसरणीकडे हा देश कायमचा सोपवला जावा यासाठी प्रयत्न करणारे हे ट्रोल्स साऱ्या भारतावरच बलात्कार करीत आहे असे दिसते. या बिनडोक ट्रोलसैन्याला कुठल्याच नीतीमूल्याचे काहीही सोयरसुतक नसते. मूल्यांशिवाय संस्कृतीचा विचार होत नाही. अशा प्रकारच्या ट्रोल्सना वापरणारे पक्ष हेच आपल्या खऱ्या संस्कृतीवरचे लांच्छन आहेत.
२००० सालापासून राष्ट्रीय संवयंसेवक संघ-भाजप ज्या नेटाने कामाला लागले त्या प्रयत्नांचे आजचे यश पाहाता त्यांचे मनःपूर्वक कौतुक करावे लागेल. ट्रोल्समार्फत बेमुर्वत प्रचाराचा हा पाचवा स्तंभ किडलेल्या लोकशाहीला देऊन त्यांनी भारतीय लोकशाहीचा चेहराच बदलून टाकला. गुंड प्रवृत्तींना रोजगाराभिमुख राजकारणाची वेगळी संधी देण्याचे केवढे मोठे निर्विवाद श्रेय त्यांना मिळणार आहे.
संघाचे एक तंत्राभिमुख विचारवंत राम माधव यांनी भाजपच्या ट्रोल-आय़टी कक्षाचे श्रेय स्वतःहून स्वतःकडे घेतले आहे त्यामुळे या कक्षाची- किंवा भारतातील ट्रोलधर्माची संस्थापना राम माधव यांनी केली असे म्हणायला हरकत नाही. त्यांची एक मुलाखत या पुस्तकात तशीच्या तशी छापलेली आहे.
भाजप आयटी कक्षाने भस्मासुर निर्माण केला आहे आणि तो जे काही उत्पात करतो आहे त्याचे ते कौतुकच करीत आहेत. पंतप्रधान या ट्रोलसैन्यातील निवडक लोकांना फॉलो करतात. या ट्रोलसैन्यातील कुणीही कितीही असभ्य भाषा वापरली तरीही त्यांना कुणीही रोखत नाही. त्यांच्यावर पक्षशिस्तीचा बडगा उगारला जात नाही. किंबहुना हे या प्रकारेच चालले पाहिजे अशीच इच्छा दिसते आहे. मुख्यतः हे राजकीय ट्रोलिंग म्हणजे सोयीच्या असत्यांचा प्रसार आणि प्रचार करण्याचे तंत्र आहे. वीपीएनची(वर्च्युअल प्रायवेट नेटवर्क) भिंत अनेक गोष्टी दडवून ठेवू शकते. त्या आड राहून लाखोंच्या संख्येने खोट्यानाट्या द्वेषमूलक अशा वक्तव्यांचा प्रसार करणे आणि त्याद्वारे भाबड्या किंवा मठ्ठ, हिंदुत्ववादी लोकांचा पाठिंबा मिळवत रहाणे हा भाजप-संघ आय़टी कक्षाचा मुख्य हेतू आहे. बाकीचे राजकीय पक्षही सत्तेसाठी टक्कर घ्यायला यात सहभागी होतील. पण फॅशिस्ट विचारसरणीच्या हाताशी असे तंत्रज्ञान आले आणि ते त्यांनी प्रभावी पणे वापरले तर गोबेल्स, हिटलर झक मारतील अशी परिस्थिती भारतात यायला उशीर लागणार नाही. या सर्वात मनमोकळे लिहिण्याबोलण्याचे, आपले मत मांडण्याचे विश्वासाचे स्थान म्हणून फेसबुक आणि ट्विटर यांचे स्थान जाईल. वॉट्सॅप ग्रुप्सवरूनही प्रचाराची राळ उडवली जाते. सत्य काय नि असत्य काय ते तपासून पाहाण्याचा विवेक वॉट्सॅप फॉर्वर्ड्सनी जवळपास संपुष्टात आणलेलाच आहे.

आय अॅम अ ट्रोल असे म्हणू शकणारे लोक अजूनही तसे कमी आहेत. भाजपच्या आय़टी कक्षात काम करणारे दोनतीनशे लोक, त्यांना फॉलो करणारे लाखो लोक या खोट्या आय़डेन्टिटीजच्या ट्रोलिंगच्या आसुरी पकडीत आलेलेच आहेत. ‘असत्यमेव जयते’ या सूत्रानुसार आपण काम करतो आहोत किंवा बळी पडतो आहोत हे भान त्यांना कदाचित् येणारही नाही. पण हे पुस्तक वाचणाऱ्या अनेकांना ही आजवर फ्युचरिस्टिक वाटणारी साय-फाय भीती खरी ठरू शकते याचे थोडेसे भान यावे…
ट्रोलिंगने भाजप-संघाच्या विजयाचा मार्ग खुला केला हे पाहून अन्य कुणीही पक्षांनी याच पातळीवर उतरू नये. ते तर चिखलातूनच उगवलेले आहेत. अन्यांनी चिखल करू नये. हे मराठी जगताला समजावे ही इच्छा हा अनुवाद करण्यामागे होती. या कामाच्या पद्धतीची ओळख झाल्यावर इतरांनीही असेच वागावे ही इच्छा आपण कदापि बाळगू शकत नाही.
मात्र यांचा पराभव करण्यासाठी सत्याचा आवाज मोठा करण्याची जबाबदारी आपणा सर्वांचीच आहे. पेंगत पडलेल्या बलाढ्य राजकीय पक्षांचीही आहे तशीच स्वतंत्र व्यक्तींचीही आहे.

या भयंकर प्रकाराला लवकरात लवकर पायबंद बसावा या दृष्टीने तक्रारी करणे, असल्या लोकांच्या ओळखी उघड करणे हे काम करण्याची इच्छा मराठी नेटनागरिकांना होवो, इतकी अपेक्षा आहे.

मुग्धा कर्णिक

.

Leave a Comment