मोदींच्या सुरक्षेच्या कारणास्तव मुलीचा बळी..

 

16 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथील पांढरकवडा येथे झालेल्या पंतप्रधानांच्या जाहीर सभेसाठी आलेल्या लोकांना पाण्याची व्यवस्था नसल्याने एका मुलीचा पाण्याअभावी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर लगेचच यवतमाळ येथील पांढरकवडा येथे जाहीर सभा घेण्यासाठी उपस्थित राहिले होते. यावेळी स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांच्या महामेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. या सभेसाठी शिवाजी वार्ड येथून काही महिला उपस्थित राहिल्या होत्या.
सभेची वेळ 11 असली, तरी या महिला सकाळी 8 वाजता सभेच्या ठिकाणी पोहचल्या होत्या, नरेंद्र मोदी यांची सभा उरकेपर्यंत 5-7 तास होऊन गेलेले होते. या दरम्यान सभेसाठी उपस्थित राहिलेल्या लोकांसाठी कोणतीही पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. याचबरोबर, या तहानलेल्या महिलांना सुरक्षेचे कारण देत सभेतून मधून बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला होता.

या सभेसाठी शिवाजी वार्डमधील क्षितिजा बाबूराव गुटेवार (वय 12) हि आपल्या आई व भावासोबत गेली होती. वेळीच पाणी न मिळाल्याने घरी आल्यानंतर क्षितिजाची प्रकृती खालावल्याने तिला आधी पांढरकवडा येथील खासगी रुग्णालयात, नंतर उपजिल्हा रुग्णालयात व तेथून यवतमाळ येथे हलविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने तिला नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, पाण्याअभावी तिचे अवयव निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिच्यावर उपचार शक्य नसल्याचेही सांगण्यात आले. अखेर उपचार सुरू असतानाच काल बुधवारी सकाळी क्षीतिजाची प्राणज्योत मालवली.

राजकीय पक्षांकडून जाहीर सभांचा केला जाणारा खर्च मोठ्या प्रमाणात असताना, अशा सभांच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसणे, हि खरंच आश्चर्यकारक बाब आहे. मोदी यांच्या जाहीर सभेसाठी गेलेल्या क्षितिजाचा पाण्याची व्यवस्था नसल्याने हकनाक बळी गेलेला आहे.

याबद्दल जितेंद्र आव्हाड यांच्याशी बोलले असता, त्यांनी ‘सध्या भारतात अमानवी संस्कृतीचं दर्शन घडताना दिसत आहे, पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर जर काही तासात पंतप्रधान जवानांना आदरांजली देण्याचे सोडून शूटिंग करत असतील, तर या एका मुलीचा त्यांच्या सभेत पाण्याची व्यवस्था नसल्याने झालेला मृत्यू याचा त्यांना काय फरक पडावा,’ असे मत व्यक्त केले.

.

Leave a Comment