मोदींची केदारनाथवारी ‘नौटंकी’च- शरद पवार

मुंबई : लोकसभा निवडणुकांचा ज्वर ओसरला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता निकालावर लागले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी केदारनाथ येथे जाऊन दर्शन घेतले. त्यांचा दौराही चर्चेचा विषय ठरला आहे. या दौऱ्यात मोदींनी परिधान केलेल्या वस्त्रांपासून त्यांनी तेथे केलेले फोटो शुट सर्वांवर चर्चा होत होती. या मोदींच्या दौऱ्यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी मोदींच्या केदारनाथ दौऱ्यावर टीका केली.

निवडणुका होतील. निकाल लागत राहतील, मात्र सध्या जे सत्तेवर आहेत त्यांनी लोकांच्या समस्या सोडवणे अपेक्षित आहे. मात्र ते हिमालयात जाऊन बसले आहेत. राजधानी दिल्ली सोडून त्यांनी हिमालयात जाणं पसंत केलं आहे. मोदींच्या या केदारनाथ यात्रेला नौटंकी म्हटलं आहे. सध्या राजकारणात नौटंकी सुरु आहे. काल संध्याकाळपासून वृत्तवाहिन्यांवरही नौटंकीच चालू होती. मोदींचे केदारनाथला जाणे ही देखील नौटंकी आहे, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

तसंच आज देशात एक वेगळीच परिस्थिती आहे. देश कोणत्या वाटेवर जाईल, सत्ता कोणत्या विचारांच्या पक्षाची येईल हे स्पष्ट व्हायला अवघे दोन दिवस उरले आहेत. प्रसारमाध्यमांनी देशात एक वेगळं वातावरण निर्माण केलं आहे. काही प्रसारमाध्यमे सत्ताधाऱ्यांच्या हातची बाहुली बनली आहेत, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

नुकत्याच जाहिर झालेल्या एक्झिट पोलद्वारे भाजपच्या हाती पुन्हा सत्ता जाणार असल्याचे भाकित वर्तवण्यात येत आहे. त्यावरही शरद पवार यांनी त्यांचे मत व्यक्त केले. मला रविवारपासून काही फोन येत आहेत. चिंता व्यक्त केली जात आहे, मात्र मी सगळ्यांना सांगतो आहे की घाबरू नका, दोन दिवसांतच सगळं चित्र स्पष्ट होईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, आम्ही समाजात बंधुभाव जपण्याचा संदेश देत आहोत, तर काही पक्षातले लोक वेगळाच विचार करताना दिसत आहेत. अशा लोकांमुळे समाजातला बंधुभाव, एकता कशी टिकून राहील? देशात परिवर्तन घडेल यावर माझा विश्वास आहे. त्यासाठी मी अल्लाहकडे दुवा मागणार आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

.

Leave a Comment