मराठा वैद्यकिय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा

मुंबई : राज्यात मागील काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत होता. तो आता पुन्हा वैद्यकिय प्रवेश प्रक्रियेमुळे ताजा झाला आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण मिळावे ही मागणी होत आहे. त्यासाठी मराठा विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनातील विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी या विद्यर्थ्यांची भेट घेतली. तसंच त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा हक्क फडणवीस सरकारला कोणी दिला?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद केलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे. या विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळण्याचा हक्क फडणवीस सरकारला कोणी दिला? असा सवाल करत, या मुलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी आजच राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेण्याचे आश्वासन त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना दिले.
राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार असूनही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही, हे या सरकारचं अपयश आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच विद्यार्थ्यांना फटका बसलाय. मग हे फडणवीस सरकार की, फसणवीस सरकार?,अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, यंदा शैक्षणिक वर्षात दंत वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. त्या मुद्द्यावरूवन मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलंय. आज या आंदोलनाचा ७ वा दिवस होता. मागन्या लवकर पूर्ण केल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

.

Leave a Comment