काश्मिरची भुमी, पत्थर आणि आपण …

‘भारत एक खोज’ या सिरीयलच्या पहिल्या भागात नेहरू गावक-यांना भारतमाता चा अर्थ विचारतात आणि म्हणतात “भारत माता का मतलब , जमीन, नदियाँ , पहाड़,खेत, घने जंगल, समुन्दर और  आसमान, तो ये सब है ही!  पर मेरे या तुम्हारे बिना ये सब बेमतलब है। सबसे अहम है भारत की सरजमींपर फैली अवाम, मतलब भारत के लोग ! दरसल अपने करोडो बेटे बेटीओंसे ही भारत माँ की पहचान है।  इसलिए उसकी जीत होगी, आप सभी की जीत से।   यानी के देखा जाये तो आप सभी आपने आप में भारत माता है। ” हे आवर्जून सांगायचे कारण म्हणजे काश्मिर मधील भारतीय जनता, भारतमातेच्या संकल्पनेत आहे की नाही हा महत्वाचा प्रश्न आज पुलवामातल्या आतंकी हल्ल्यानंतर सर्वांसमोर आहे.

पुलवामा इथला आतंकी हल्ला करणाऱ्या जैश इ मोहम्मद या अतिरेकी संघटनेच्या अतिरेक्याने हल्ल्यापूर्वी आपणास जन्नत मध्ये जायचे असल्याचा व्हिडीओ जारी केला होता! जहांगीर या मुघल सम्राटाने ,”गर फिरदौस बर रूये ज़मी अस्त/ हमी अस्तो हमी अस्तो हमी अस्त” (धरती पर अगर कहीं स्वर्ग है, तो यहीं है, यहीं है, यही हैं), असे काश्मिरचे वर्णन करून ,काश्मिरलाच जन्नतची उपमा दिली होती. त्याच काश्मीर मधील एक युवक काश्मिरच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली जन्नतची आस मनात घेवून मरण पत्करतो. ही बाब धर्मवेडेपणाची तर आहेच शिवाय वास्तवातील भौतिक जीवन उध्वस्त करून अाभासी स्वर्गाची ओढ लागण्याच्या स्थितीपर्यंत कश्मिरी युवक का जात आहेत याचा गंभीर विचार करायला लावणारी देखील आहे. एकूणच काश्मीर मधील स्थिती आज अतिशय गंभीर असून , याची कबुली केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांनी देखील दिली आहे.

पुलवामा हल्ल्याचे पडसाद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पडले . परंतु या घटनेचा निषेध म्हणून भारतातील काही राज्यांत शिक्षण व व्यवसायासाठी राहिलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांवर हिंदुत्ववादी संघटनांकडून हल्ले केले जात आहेत, हे जास्त चिंताजनक आहे. काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ले करणारे हे लोक पाकिस्तान गेल्या सत्तर वर्षापासून जे करण्यात अपयशी ठरला होता, तेच यशस्वी करण्याच्या पाकिस्तानी उद्दिष्टांची पूर्तता करत आहेत. पण याची जाणीव मात्र अशा सत्ताधारी पक्षांच्या समर्थकांना अजिबात नाही. उलट पुलवामा येथील हल्ल्यामुळे जनतेत राष्ट्रवादाची भावना आहे, तिला मतात रुपांतर करा , असे आदेशच भाजपचे नेते कार्यकर्त्यास देताना दिसून येत आहेत.

माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी, काश्मिरी लोकांवर देशभर हल्ले होवू लागले तेंव्हा, काश्मिरी लोकांबद्दल मनात आकस ठेवून निव्वळ काश्मिरी भूमी बद्दल ओढ असेल तर त्यास देशभक्ती म्हणता येणार नाही असे वक्त्यव्य केले! अतिशय सूचक अशा या वक्तव्याचे वर्णन कांहीनी वादग्रस्त असे केले मात्र त्यात मोठा अर्थ दडलेला आहे.

सांस्कृतिक राष्ट्रवादास प्रखर राष्ट्रवाद असल्याचे प्रतीत करून आधुनिक काळात निर्माण झालेल्या भारतीय राष्ट्रवादाच्या संकल्पनेचे सपाटीकरण करणारे हे लोक या देशात ,देशभक्तीच्या स्वतःला सोयीस्कर अशा सर्वंकष व्याख्या प्रचलित करत आहेत. देशाचे नागरिकत्व धर्माच्या आधारावर ठरवून धार्मिक ध्रुवीकरणातून राजकीय स्वार्थ साधणाऱ्या संघटनांना अखंड भारतमाता केवळ पूजा करण्यासाठी हवी आहे, कारण भारतमातेच्या त्यांच्या संकल्पनेत भारतमातेच्या पुत्रांना कांहीच स्थान नाही.

काश्मीर मधील समस्येचे समाधान शोधत असताना , राष्ट्र, देशभक्ती , देशप्रेम आणि देशद्रोह या संकल्पनांचा विवेकी विचार केला पाहिजे. सांस्कृतिक तसेच संकुचित राष्ट्रवाद मांडणाऱ्या संघटनांच्या कल्पनेशिवाय हा विचार करणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पना एकतर ठराविक धर्माशी आणि निव्वळ भूभागाशी निगडीत आहेत, ज्यात जनतेला स्थानच नाही ! म्हणूनच काश्मीरचा प्रश्न हा निव्वळ लष्करी मार्गाने सुटू शकणारा नसून तो राजकीय सुधारणाच्या माध्यमातून सोडविणे गरजेचे आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी जम्मू आणि काश्मीर मधील जनतेच्या शेख अब्दुल्ला या नेत्याने काश्मिरी जनतेचे भविष्य भारतासोबत घडविण्याचे ठरवले होते, ते भारतातील गांधी आणि नेहरूंचे नेतृत्वावर विश्वास ठेवूनच ! ही बाब ‘आतिशे चिनार’ या शेख अब्दुल्लांच्या आत्मचरीत्रामधे नमूद केली आहे. एका विशेष परिस्थितीत भारतात समाविष्ट झालेल्या काश्मिरी जनतेस कांही विशेष सवलती देणे क्रमप्राप्तच होते.

काश्मीर भारतात असायला हवे हा आग्रह नेहरूंचाच होता आणि त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले. जो पर्यंत नेहरू हयात होते तोपर्यंत काश्मीर मधील सत्ताबद्दल फोडाफोडीने झाले तरी शेख अब्दुलांच्या प्रभावामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला नाही. नेहरू १९६४ ला गेले ,परंतु शेख अब्दुल्ला १९८२ पर्यंत होते, त्यामुळेही कश्मीरी जनता दिल्लीवर तेवढी नाराज नव्हती. मात्र शेख अब्दुल्ला मृत्यू १९८२ मध्ये झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सची सारी सूत्रे डॉ. फारूख अब्दुलांकडे आली. वडिलांच्या मृत्यूच्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होवून फारूख अब्दुल्ला १९८३ च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आले आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली. पण अमानुल्ला खान, हासीम कुरेशी आणि मकबुल भट यांच्याबरोबर संबंध असल्याच्या आरोपावरून इंदिरा गांधींनी डॉ. फारूख अब्दुल्लांचे सरकार बरखास्त करून काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. पुढे इंदिराजींच्या हत्त्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि १९८५ मध्ये राजीव-फारूख समझोता होवून १९८७ च्या निवडणूका राजीव गांधी आणि फारूख अब्दुल्ला यांनी मिळून लढवल्या. पुन्हा १९८७ मध्ये फारूख अब्दुल्ला मुख्यमंत्री झाले. फारूख यांचे पुन्हा सत्तेवर येणे आणि जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या भारतविरोधी संघटनेला पाठिंबा मिळणं या दोन्ही गोष्टी एकाचवेळी सुरु झाल्या. तेंव्हापासून कत्तली, दंगलीचं वातावरण जे सुरु झालं ते आजतागायत चालू आहे. याचाच एक भाग म्हणून १९८९ मध्ये तर सबंध काश्मीरमध्ये लोकसभांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला. याच काळात पाकिस्तानने त्यांचे ‘ऑपरेशन जिब्रॉल्टर’ सुरु केलं आणि १९९० साली काश्मीरची परिस्थिती कमालीची बिघडली. या काळात पाकिस्तानचा काश्मीर मधील हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणात वाढला. त्याला प्रमुख कारण म्हणजे भारतीय मानसिकतेला समजून घेणारा एकही नेता शेख अब्दुल्लांच्या नंतर काश्मीरमध्ये निर्माण झाला नाही. त्याचवेळी १९६४ साली जवाहरलालजींचा मृत्यू आणि ३१ ऑक्टोबर १९८४ ला झालेल्या इंदिराजींच्या हत्येनंतर काश्मीरच्या जनतेस विश्वासात घेवू शकेल, असं नेतृत्व भारतातही निर्माण होवू शकलं नाही. म्हणूनच काश्मीरच्या अशांततेला १९८४ नंतर सुरूवात झाली आणि १९९० साली जगमोहन यांच्या राज्यपाल पदाच्या कारकिर्दीत तर ही अशांतता अतिशय उच्च अवस्थेला पोचली. आज घडणार्‍या अनेक घटना याचीच परीणीती असून याच परिस्थितीतून काश्मीरची समस्या अधिक बिकट बनली आहे.

काश्मीर समस्येचा उपाय हा मुळात लष्करी स्वरूपाचा नसून तो राजकीय स्वरूपाचा आहे, हीच बाब निवृत्त लष्कर प्रमुखांनी नुकतीच आवर्जून मांडली आहे. काश्मीरची स्वायत्तता हाच प्रमुख विषय सातत्याने केंद्र सरकार आणि काश्मीरमधील राज्य सरकार यांच्यामधील संबंधांमध्ये चर्चिला गेला आहे. काश्मीरमधील स्वायत्ततेची मागणी करणारे गट काश्मीरच्या स्वायत्ततेचा संबंध काश्मीरमधील १९५३ च्या पूर्वीच्या परिस्थितीशी जोडतात म्हणून काश्मीरच्या स्वायत्ततेबद्दल कोणत्याही केंद्र सरकार तर्फे जेंव्हा आश्वासन दिले जाते तेंव्हा अनेकांना हे आश्वासन म्हणजे भारतीय सार्वभौमत्वावर आणि अखंडत्वावर घाव घालणारं आहे, असे वाटते. आज सत्तेवर असणाऱ्या भाजपने आजपर्यंत असाच प्रचार करून देशात राजकारण केलेले आहे. भाजप आणि संघपरिवार यांचे काश्मीर विषयक धोरण म्हणजे केवळ लक्षणे पाहून केलेली उपचारपद्धती आहे ,जी व्याधीला पूर्णपणे दूर करू शकत नाही. परंतु हे सर्व करत असताना भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व याचा सन्मान व्हायला महत्वाचा आहेच. यासाठी सध्याच्या सरकारने खूप समजूतदार भूमिका घेण्याची गरज आहे,मात्र हा समजूतदारपणा भाजपने आजपर्यंत देशद्रोह्यांचे लांगुंचालन किंवा लाड या स्वरुपातच पाहिलेला आहे.

काश्मिरी जनता जेंव्हा भारतीय फौजावर जेंव्हा पत्थरबाजी करतात तेंव्हा, भारताची अवस्था …

मै जीसके हाथ में फुल देके आया था
उसीके हाथ का पत्थर मेरी तलाशमें है

अशी वाटते. पण त्याच वेळी आणखी एक शेर आठवला. जो खूप विचार करायला लावणारा आहे ..

ऐसें तो दिल को कोई बनता नही है पत्थर
बेवजह यूं किसेके हाथ आता नही है पत्थर

काश्मिरी युवकांच्या हातात खरे तर पेन, वही, पुस्तक असायला हवे, आज ते बंदुका हातात घेऊ पाहताहेत आणि बंदुका मिळत नाहीत किंवा बंदुका घेऊन प्रश्न सुटतील याची खात्री वाटत नाही म्हणून की दगड घेताहेत. अजून हातात त्यांच्या पत्थरच आहेत तोपर्यंत वेळ गेलीली नाही, हे भारतीयांनी समजून घ्यायला हवं!

काश्मिरबद्दल एक शेर आहे,…

जर्रा जर्रा है मेरे काश्मिर का मेहमांनवाज
राहमें पत्थरके टुकडोंने दिया पानी मुझे

काश्मिरच्या समस्येंवर उपाय शोधायचा असेल तर भारतीय फौजांवर बरसणारा पत्थर कश्मिरींच्या हातात येऊ न देता पाणी देणारा पत्थर यायला हवा, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.

© राज कुलकर्णी

.

Leave a Comment