देश शोकात…तर मोदी ‘उपभोगा’त…

पुलवामा येथे झालेला CRPF जावानांवरील हल्ला हा आजवरचा हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला समजला जात आहे. गुरूवारी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा हल्ला झाला. मोदींनी ट्वीटरवर या हल्ल्याचा निषेध ६ वाजून ४६ मिनिटांनी केला. दरम्यानच्या तीन तासात मोदी कुठे होते, हा प्रश्न उपस्थित होतो, तर ते जिम कार्बेट येथे जंगल सफारी करत होते, तसेच डिस्कवरी चॅनलसोबत एका कार्यक्रमाची शुटींगमध्ये सहभागी होण्यात व्यस्त होते.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात होता परंतु, मोदी हे चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात मग्न होते, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ता रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केला आहे. याचबरोबर, जवान शहीद झाल्यानंतर प्रचार सभांमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून भाजपनं राष्ट्रीय दुखवटा देखील घोषित नाही केला,’ अशी टीका रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.

मोदींनी पावणे सात वाजता म्हणजेच हल्ल्यानंतर तब्बल सव्वातीन तासांनंतर घटनेवर दुःख व्यक्त केलं. तत्पूर्वी १७ मिनिटं आधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ६ वाजून २९ मिनिटांनी हल्ल्याबाबतच्या आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या होत्या.
‘हल्ल्यानंतर देशावर शोककळा पसरली होती, पण त्याचवेळी मोदी हे जिम कार्बेट या राष्ट्रीय उद्यानात फोटो काढण्यात मग्न होते तर अमित शहा हे राम मंदिराची घोषणा करण्यात व स्वतःचा जयजयकार करण्यात व्यस्त होते आणि कॉंग्रेसला निशाणा बनवत होते,’ असा आरोप रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना, सुरजेवाला यांनी दहशतवाद्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणलीच कशी? जवानांसाठी विमानाची का नाही व्यवस्था केली गेली? शिवाय, जैश – ए – मोहम्मदच्या धमक्यांकडे दुर्लक्ष का केलं गेलं? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्याचबरोबर देशाची सध्याची एकंदरीत परिस्थिती बघता मोदी हे दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर जात आहेत, यावर देखील सुरजेवाला यांनी कडाडून टीका केली आहे.
१४ फेब्रुवारी ला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याची जबाबदारी जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं घेतली असून, अझहर मसूद हा या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आहे.

‘भारतीय जवानांच्या बलिदानाबाबत नरेंद्र मोदींचं वर्तन एक पंतप्रधान म्हणून बेजबाबदारपणाचं, बेफिकीरीचं होतं, हे झाकलं जाऊ शकत नाही.’ असं मत राज असरोंडकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट करताना व्यक्त केलं आहे.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment