जंटलमन बाबासाहेब : काय होतं त्या थ्री-पीस-सूट मागचं रहस्य?

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. लाखोंचा मुक्तीदाता, घटनेचे शिल्पकार, एक जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, एक नावाजलेले वकील व एक उत्कृष्ट राजकारणी असलेले बाबासाहेब आजच्याच दिवशी आपल्या सर्वांना सोडून गेले.

देशभरात आज बाबासाहेबांचे हजारो पुतळे उभे आहेत. मात्र या सर्व पुतळ्यांत आपल्याला एक समान गोष्ट दिसून येते, बाबासाहेबांच्या प्रत्येक पुतळ्यांत त्यांनी एक नीटनेटका, स्मार्ट थ्री पीस सूट घातलेला आहे. चष्मा, थ्री पीस सूट आणि पायात उंची बूट या पेहरावातच बाबासाहेबांचे असंख्य फोटो आपल्याला दिसतात. अंगात सूट नसलेला बाबासाहेबांचा एकमेव प्रसिद्ध फोटो आहे तो नागपूर येथे धम्म दीक्षा घेतानाचा..

राजकीय भाषण असो, घटनासमितीचं काम असो की कोर्टात बाजू मांडताना असो, बाबासाहेब नेहमी टापटीप पोशाखात दिसायचे. अगदी बाबासाहेबांचा पेन सुद्धा अगदी महागडा व उच्च दर्जाचा “विल्सन” ब्रॅण्डचा व्हॅक्युमॅटिक पेन असायचा.

इंग्लंडमध्ये कायद्याचं शिक्षण घेताना बाबासाहेबांना नीट टापटीप पोशाख करायची साहेबी सवय लागली होती, असं मानलं तर महात्मा गांधीजी व पंडित नेहरू हे सुद्धा इंग्लंडमध्ये शिकलेले उच्चशिक्षित वकील होते, सरदार पटेल सुद्धा वकील होते असे असताना त्यांची वेशभूषा मात्र सामान्य असायची.

जवाहरलाल नेहरू नेहमी एक जाकीट (आता नेहरू जाकीट म्हणून फेमस असलेले व मोदी जाकीट म्हणून बदनाम असलेले) आणि सुती सदरा वापरायचे, गांधीजी नेहमी पंचा वापरायचे, सरदार पटेलांची वेशभूषा ग्रामस्थांची असायची.
त्यामुळेच सर्व राष्ट्रीय नेत्यांमध्ये बाबासाहेब अगदी उठून दिसायचे. खरंतर या वेशभूषेमागे बाबासाहेबांची एक विशिष्ट अशी विचारसरणी होती. त्या काळात भारतात जातीभेद व अस्पृश्यता मोठ्या प्रमाणावर पाळल्या जायची. सकाळी दलितांच तोंड बघू नये, दलितांची सावली अंगावर पडू नये, पाणवठा एक असू नये अश्या कित्येक जातिभेदी कुप्रथा समाजात त्याकाळी होत्या, इतकंच काय तर दलिताने नवीन कपडे सुद्धा घालायला मज्जाव त्याकाळी होता. दलिताने नवीन कपडे घेतलेच तर आधी ते मातीत भरऊन घ्यायचे अन मगच अंगात
घालायचे, नवा कोरा कपडा अंगावर घातलेल्या दलित समाजाच्या व्यक्तीला गावातून बहिष्कृत करण्यासारख्या शिक्षा दिल्या जायच्या. पाऊलखुणा उमटू नयेत म्हणून कमरेला झाडू अन थुंकीचे शिंतोडे पडू नयेत म्हणून गळ्यात मडकं असा अपमानजनक वेष तेव्हा दलित समाजातील व्यक्तींना करावा लागायचा.

दक्षिणेतील त्रावणकोर राज्यात नादर व इझवा समाजाच्या स्त्रियांना त्यांचे वक्षस्थळ झाकायला बंदी होती, राजस्थानात दलित समाजातील पुरुषांना रंगीत पगडी घालायला तर संपूर्ण उत्तर भारतात दलितांना मिशांना पीळ भरायला मज्जाव होता. दलित महिलांना सोन्याचांदीचे दागिने घालायलाही बंदी होती, तामिळनाडूच्या कित्येक भागात तर आजही दलित समाजातील पुरुष लुंगी गुडघ्याइतक्या उंचीवर घेऊ शकत नाहीत, त्यांना ती लुंगी पायघोळ घालावी लागते, अशाप्रकारे कपडे व पेहराव ही मध्ययुगीन विचारसरणीचं एक प्रतिक बनलेलं असताना, बाबासाहेबांची उच्चभ्रू वेशभूषा एक नवीन आयाम प्रस्थापित करायची.
थ्री पीस सूट घालण्यात बाबासाहेबांची एक बंडखोरी होती, व्यवस्थेविरुद्धचा उठाव होता. ज्या जातीची सावली नकोशी होती त्या जातीत जन्माला येऊन, संघर्ष करून शिक्षण घेऊन बाबासाहेबांनी सामाजिक नियम धुडकावून लावत एक नवीन सुरुवात त्यांच्या पोशाखातून केली होती. ज्यांना मेलेल्या माणसाचे कपडे घालायला बाध्य केल्या जायचं त्यांच्यातल्या एकाने इंग्रज साहेबाच्या तोडीस तोड कपडे घालावेत हे बघून जातीयवाद्यांचा तिळपापड व्हायचा पण हा काही बाबासाहेबांचा उद्देश नव्हता.
आपल्याला बघून दलित समाजातला तरुण प्रेरित होतोय, शिकू लागतोय याची जाणीव बाबासाहेबांना होती. तो तरुण आपल्याला फॉलो करणार असेल तर आपण एक आदर्श उदाहरण समोर ठेवलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं होतं.

असं असलं तरी बाबासाहेबांचा पोशाख कधीच झगमगाटी व दिखाऊ नव्हता, पिवळ्या कोटावर पांढरे शूज घालून किंवा फुलफुलांचे शर्टस घालून बाबासाहेब कधीच दिसले नाहीत, त्यांच्या पोशाखात एक सभ्यता होती, ब्रिटिश मॉडेस्टि होती व ते शेवटपर्यंत जंटलमनच राहिले.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment