बुलेट ट्रेन साठी फ्लेमिंगो पक्ष्यांची कत्तल होणार ?

मोदी सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असणारा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा पर्यावरणीय अधिवासावर घाला घालणारा ठरणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष व केंद्रीय पर्यावरण मंत्री हर्ष वर्धन यांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे फ्लेमिंगो पक्षाचे अभयारण्य व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांच्या अधिवासावर घाला येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


फ्लेमिंगो पक्षाच्या अभयारण्यातील जवळजवळ ३.२७५६ हेक्टर जमीन कमी होणार आहे तर संरक्षित जंगल म्हणून राखून ठेवलेल्या ९७.५१८९ हेक्टर जमीनी या प्रकल्पामुळे असुरक्षित होणार आहेत.

मुंबई-अहमदाबाद दरम्यान होणाऱ्या या प्रकल्पामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होणार असून, विकासाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला पर्यावरणाच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. केंद्रीय पर्यावरण खात्यानेच या हस्तक्षेपाला परवानगी दिल्याने अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिली आहेत. याबद्दल पर्यावरणतज्ञ डॉ.महेश गायकवाड यांना विचारले असता, त्यांनी फ्लेमिंगो हा पक्षी मुळातच दुर्मिळ असून, तो मुंबई व परिसरातून इतरत्र महाराष्ट्रभर जात असतो. जर त्याच्या अधिवासातून हा महामार्ग गेला तर या पक्षाच्या लोकसंख्येवर त्याचा नक्कीच दुष्परिणाम होईल व एकाच्या महत्वाकांक्षेमुळे कोणावर अन्याय होऊ नये, असे मत मांडताना हा प्रकल्प पर्यावरणाला घातक आहे व अशा प्रकल्पांना मंजूरी मिळू नये, असे सांगितले.

नरेंद्र मोदी व जपानचे शिन्जो अबे यांनी २०१७ मध्ये या प्रकल्पाचे अहमदाबाद येथे उद्घाटन केले होते. हा प्रकल्प २०२२ मध्ये प्रत्यक्षात येणार असल्याचे मोदीनी सांगितले होते.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment