युती न करताही भाजप मिळवू शकते बहुमत, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट च्या सर्व्हेतून झालं स्पष्ट.

राज्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युती तुटणार कि राहणर याची जोरदार चर्चा सुरु असतानाच भारतीय जनता पक्षाला एकहाती बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवणारा ओपिनियन पोल MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट या पुण्याच्या ख्यातनाम संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. भाजपा एकटी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास स्वबळावर १७६ जागा जिंकेल असे हा सर्व्हे दर्शवतो आहे, शिवसेना फक्त ५२ जागांवर सीमित राहील तर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अनुक्रमे ३३ आणि १८ जागा मिळवतील असा अंदाज आहे. बहुचर्चित वंचित बहुजन आघाडीला २ जागा मिळतील असंही या सर्व्हेत म्हटलं आहे, हा सर्व्हे केला तेव्हा एम आय एम आणि भारिप बमसं यांची युती शाबूत होती.
पुण्याच्या MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट तर्फे २५ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट या दरम्यान हा ओपिनियन पोल घेण्यात आला. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ३० विधानसभा क्षेत्रात जाऊन मतदारांशी थेट चर्चा करून हा ओपिनियन पोल तयार करण्यात आल्याची माहिती आज पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेच्या प्राध्यापकांनी दिली. मतदानाच्या प्रमाणाचं जिंकणाऱ्या जागांमध्ये रुपांतर करण्यासाठी युनिफोर्म स्विंग हि पद्धत वापरण्यात आल्याचंहि त्यांनी सांगितलं.
या ओपिनियन पोल नुसार भाजपने संपूर्ण मतदानाच्या ४५% मते आणि १७६ जागा घेऊन सर्वात मोठा पक्ष राहील, मागील विधानसभेत भाजपला ३१% वोट शेअर आणि १२२ जागा मिळाल्या होत्या, इतर तिन्ही प्रमुख पक्षांच्या मतदानाच्या टक्केवारीत घसरण झाली असून शिवसेना १९% वरून १५% वर तर कॉंग्रेस १८% वरून १४% वर आली आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी घसरण झाली असून राष्ट्रवादी १७% वरून ७.८५% वर आली आहे.
युती राहणार कि तुटणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच हा सर्व्हे पुढे आला आहे, भारतीय जनता पक्ष शिवसेनेला १०० पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नसल्याच्या बातम्या पुढे आल्यापासूनच युती बद्दल दोन्ही पक्षांच्या नेत्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या बर्याच नेत्यांनी भाजपात पक्षांतर केल्याने भाजपचीही डोकेदुखी वाढली असून युतीतला मोठा भाऊ म्हणून शिवसेनेची जागा व्याप्त करण्याची रणनीती भाजपा यंदाच्या निवडणुकीत आखू शकतो.
विशेष म्हणजे चारही प्रमुख त्यांच्या पारंपारिक युतीतून लढले तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्रित ५१ जागा जिंकतील तर भाजप-शिवसेना युतीला २२८ जागा मिळतील असंही हा सर्व्हे सांगतो.
युतीबद्दल अनिश्चितता असताना तिकडे आघाडीत मात्र जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रत्येकी १२५ जागा लढवणार हे जवळपास निश्चित झालं असून ३८ जागा ह्या स्वाभिमानी, कवाडे गट या घटकपक्षांसाठी सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

.

Leave a Comment