बारामती लोकसभा मतदारसंघ:सुप्रिया सुळे उवाच!

भारतातील निवडणुकांच्या राजकारणात लोकसभेच्या अशा काही ठराविक जागा आहेत त्या जागांवर तेथील प्रस्थापित राजकारण्यांशिवाय इतर कोणी निवडून येणं हे जवळ जवळ अशक्य आहे.त्यामध्ये उत्तरप्रदेशातील अमेठी-रायबरेली,मध्यप्रदेश मधील छिंदवाडा,आणि महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघ येतात.2014 च्या तथाकथित मोदी लाटेत सुद्धा विरोधक ह्या मतदारसंघांना खिंडार पाडू शकले नाहीत. बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांचा परंपरागत बालेकिल्ला मानला जातो.2009 पासून त्यांच्या कन्या सौ. सुप्रिया सुळे ह्या या मतदारसंघांच संसदेत प्रतिनिधित्व करत आहेत.
भारतात सध्या लोकसभा निवडणूकांच वारं जोमाने वाहतय.प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झाडल्या जात आहेत, निवडणुकीची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचलेली आहे.अशा परिस्थितीत मोदी-शाह ह्या जोडगोळीला सत्तेत पुनर्स्थापित होण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघावर आपला कब्जा असावा असे मनोमन वाटू लागले आहे.त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना आदेश देऊन प्रचाराची पुर्ण फौजच त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात उतरवलेली पहायला मिळते.ती फौज सुप्रिया सुळेंवर टीका करण्याची एकही संधी गमावण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही.
भारतीय जनता पक्षाकडून बारामती च्या रिंगणात दौंड येथील त्यांच्या मित्रपक्षाचे आमदार राहूल कूल ह्यांच्या पत्नी सौ. कांचन राहूल कूल ह्यांना उतरविले आहे.सौ.कांचन ह्या संपूर्णतहा नवख्या विरुद्ध सौ. सुळे ह्या अत्यंत तरबेज अशा संसदपट्टू म्हणून ही लढत आपल्याला पहायला मिळेल.सौ.कांचन ह्यांनी आपल्या प्रारंभाच्या भाषणातच सुळेंवर “अतिरेकी”अशी खालच्या थरावर जाऊन टिका केली.त्यावर सौ. सुळे ह्यांनी “कांचन ला मी फार पूर्वीपासून ओळखते आणि ती अत्यंत सुसंस्कृत मुलगी आहे” अशी “जबाबदार स्त्री”ला शोभेल अशी प्रतिक्रिया दिली.(मुळात स्वतंत्र भारतात जो प्रथम “अतिरेकी” ठरला त्या नथूराम गोडसेला देव मानणाऱ्या कांचन आणि त्यांच्या पक्षाकडून असा बुद्धिभेद केला जाणं ही काही नवी गोष्ट नाही).
शिवसेनेचे आमदार सुद्धा सौ.सुळेंवर टीका करून आपल्या मित्रपक्षाला खुश करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.युतीचे राज्यमंत्री असणारे सेनेचे विजय शिवतारे ह्यांनी नुकतीच “सुप्रिया सुळे ह्यांचं संसदीय कर्तृत्व शून्य आहे,त्या फक्त शरद पवारांची कन्या आहेत हीच त्यांची एकमेव ओळख”अशी टीका केली.मुळात शिवतारेंना हे राजकीय अज्ञान असावं की, मे 2014 पासून सौ. सुळे ह्यांचे ना वडील सत्तेत आहेत, ना भाऊ.संसदेत 96% उपस्थिती असणाऱ्या, जास्तीत जास्त चर्चेत भाग घेणाऱ्या, अभ्यास करून समाजोपयोगी खाजगी बिलं मांडणाऱ्या,देशाच्या संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारून सरकारला धारेवर धरणाऱ्या, मतदारसंघात कार्यसम्राट असणाऱ्या मोजक्या खासदारनमध्ये सौ. सुळेंची गणना होते.त्यांच्या ह्या कामाची योग्य ती दखल घेऊन संसदेने त्यांना संसदेचा अत्यंत प्रतिष्ठित असा “संसदरत्न” हा पुरस्कार सलग 5 वेळा प्रदान करून यथेच्छ गौरव केला आहे.
त्यानंतर अकलीचे तारे तोडले ते शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे ह्यांनी.त्यांनी असं विधान केलं की “कांचन ताई दिल्ली मे,और सेल्फीवाली बाई गल्ली मे”.आजकाल तरुण पिढी मध्ये सेल्फी घेण ही अत्यंत प्रिय पद्धत म्हणून दिसून येते.त्याला अनुसरून जर लहान मुलांपासून ते तरुण मुलामुलींमध्ये सुप्रिया सुळे प्रसिद्ध होतं असतील तर इतरांचा जळफळाट होणं स्वाभाविक आहे.गांधीजी म्हणायचे की त्यांना 125 वर्षे जगायची इच्छा आहे, आणि त्या वयात सुद्धा तेव्हाच्या तरुण पिढीच्या विचारांनुसार त्यांना जगायला आवडेल.काळानुसार स्वतामध्ये बदल करणे हे नीलम गोर्हेनसारख्या पुराणमतवादी मंडळींकडून नक्कीच अपेक्षित नाही.
सुप्रिया सुळे ह्यांच्या मतदारसंघात फिरताना एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव होते ती म्हणजे लोकांमध्ये त्यांच्याविषयी आढळणारी कृतज्ञता.कुठे ती “वयश्री”योजनेअंतर्गत चस्मा,काठी ह्या गोष्टींच्या लाभार्थी ठरलेल्या वयस्कर महिलांमध्ये असो, तर कुठे त्यांनी वाटलेल्या श्रवण यंत्रा द्वारे ऐकू येणाऱ्या नागरिकांमध्ये. कुठे ‘गावरान’ योजने अंतर्गत ग्रामीण स्त्रियांना मिळालेला रोजगार असो वा तरुणांना शरद युवा महोत्सवातुन मिळालेला रोजगार असो.तसेच रस्ता,वीज,पाणी इत्यादी मूलभूत गोष्टींच्या पूर्ततेतून असो,सर्व स्तरातुन त्यांच्या विषयीची कृतज्ञता स्पष्ट दिसून येते.
तरुण मुली आणि त्यांचं शिक्षण हा सौ.सुप्रिया सुळेंचा अगदी जिवाभावाचा विषय. पवार चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून गरजू मुला-मुलींना कसलाही गवगवाट न करता केलेल्या आर्थिक मदतीची उदाहरणं सर्रास दिसून येतात.शाळेत जाणाऱ्या मुलींना शाळेत वेळेत पोहोचता यावं ह्यासाठी मतदारसंघात वाटलेल्या 25000 सायकली गुलाबी फुलपाखरांसारख्या वावरताना भासतात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाचा जो थोर लोकोत्तर द्रष्टा महामानव होऊन गेला,ज्यामुळे आपल्या सारख्या असंख्य स्त्रियांना शिक्षणाचा आणि बरोबरीचा हक्क मिळाला त्या माणसाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी”संविधान स्तंभ”मतदारसंघात जागोजागी आढळतात.ते पाहून संविधानावर निष्ठा असलेल्या कोणाही माणसाचे मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही.भविष्यात रब्बर स्टॅम्प म्हणून वावरेल अशा आमदाराच्या पत्नीपेक्षा,स्वकर्तुत्वाने स्वतःला सिद्ध केलेल्या खासदाराचीच निवड पुन्हा एकदा बारामतीकर करतील ह्यात यत्किंचित शंका वाटत नाही असं तेथील मतदारसंघाचा एकंदरीत आढावा घेतल्यावर निष्कर्ष निघतो……..त्यामुळेच शेवटी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, बारामती लोकसभा मतदारसंघ:सुप्रिया सुळे उवाच!

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment