महाराष्ट्राच्या राजकारणातील युवा चेहरे

महाराष्ट्रामध्ये अनेक व्यक्तिमत्व अशी आहेत ज्यांचा राजकारणामध्ये दांडगा अनुभव आहे. अनुभव आणि राजकारणातील डावपेचांमध्ये ही व्यक्तिमत्व माहीर झालेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासोबतच देशाच्या राजकारणावर ही त्यांनी छाप सोडली आहे. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासारख्या दांडगे व्यक्तिमत्वाच्या लोकांची राजकारणातील कारकीर्द उल्लेखनीय आहे.

येणाऱ्या काळात राजकारणात एक नवी पिढी सक्रिय होताना दिसत आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तरुण व्यक्तिमत्त्वांचा समावेश जास्त दिसून येत आहे.
या तरुण उमेदवारांमध्ये उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांची चर्चा जोरात चालू आहे. आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी भागातून निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश माने लढत देणार आहे. त्यासोबतच मराठी बिग बॉस मधील अभिजित बिचुकले हे सुद्धा आदित्य ठाकरेंना टक्कर देण्याच्या विचारात आहेत.

या विधानसभेत ठाकरेच नाहीत तर पवार यांची पुढची पिढी म्हणजेच रोहित पवार शर्यतीत उतरणार आहेत. रोहित पवार हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. कर्जत- जामखेड हा रोहित पवारांसाठी नवीन मतदारसंघ असून तिथे मंत्री राम शिंदे यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. परंतु, रोहित यांची चाललेली तयारी बघता काट्याची टक्कर होणार असं दिसतंय.

सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांच्याऐवजी आता त्यांचा नातू डॉ. अनिकेत देशमुख सांगोल्यातून निवडणूक लढवणारआहेत. सांगोल्याची उमेदवारी पहिल्यांदा भाऊसाहेब रुपनर यांना दिली गेली होती परंतु, कार्यकर्त्यांच्या मतानुसार ही उमेदवारी अनिकेत देशमुख यांना बहाल केली. सांगोल्यातील देशमुखांची सत्ता आता त्यांचा नातू पुढे तशीच टिकवून ठेवणार कि नाही हे २४ तारखेला कळेल.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन्ही चिरंजीव अमितदेशमुख आणि धीरज देशमुख  लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. देशमुख कुटुंबाने दोन्ही ठिकाणी ताकत लावली आहे.

कणकवलीमधून नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे आता भाजपकडून विधानसभा लढवणार आहे. काँग्रेसमधून पक्षांतर करून भाजपमध्ये आल्यानंतर नितेश राणे यांच्या राजकीय कारकिर्दीत नक्की काय बदल दिसतील ही एक उत्सुकता सर्वांनाच आहे.

कोल्हापूरमधून डी.वाय.पाटील यांचे नातू आणि आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील लढत द्यायला सज्ज झाले आहेत. ऋतुराज पाटील काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहे. ऋतुराज यांच्या विरोधात भाजपचे अमल महाडिक उभे राहणार आहेत. सध्या तरी ऋतुराज यांचे पारडं जड दिसत आहे. तरीही ही लढत एकतर्फी नक्कीच होणार नाही.

येत्या विधानसभेमध्ये खान्देशातील मुक्ताईनगरमधील जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे निवडणूक लढवणार नसून त्यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर या निवडणूक लढवणार आहे. भाजपने नाथा भाऊंना तिकीट नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये बरीच नाराजी होती. त्यानंतर रोहिनी खडसे यांना तिकीट जाहीर झाले, या मतदारसंघात काय होतंय हे पाहणे औत्सुक्याच ठरेल.

त्यासोबतच सोलापूरमधून जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे विधानसभेच्या रणांगणात उतरल्या आहेत आणि त्यांना टक्कर द्यायला शिवसेनेचे दिलीप माने सज्ज आहेत. प्रणिती शिंदे यांना ही निवडणुक  अवघड जाईल अशी स्थानिक पातळीवर चर्चा आहे.

माळशिर भागातून भाजपने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते राम सातपुते यांना उमदेवारी दिली आहे. राम सातपुते हे विद्यार्थी दशकापासून समाजकारणमध्ये सक्रिय आहेत. राम हे मूळचे  बीड जिल्ह्यातले एका ऊसतोड मजुराच्या मुलाला जनता किती पसंत करते हा देखील उत्सुकतेचा विषय आहे.

या तरुणाईचा जोश अनेक सामाजिक माध्यमांवर दिसून येत आहेत. आता आता यातील कोण कोण जनतेच्या परीक्षेत पास होतय येणाऱ्या चोवीस  तारखेला कळेल.

.

Leave a Comment