एका आर्मी मेजरचं देशाच्या नावे पत्र..

(मेजर डी. पी. सिंग हे कारगिल युद्धात शौर्य गाजवलेले भारतीय सैन्यातले मेजर आहेत, या कामगिरीत त्यांना आपला संपूर्ण उजवा पाय गमवावा लागला, मात्र “बदला घ्या, बदला घ्या” म्हणून ओरडणाऱ्या झी न्यूज च्या अँकर ने काल त्यांचा एका टीव्ही डिबेट मध्ये अपमान केला, त्यानंतर त्यांनी लिहिलेली ही पोस्ट त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवरून अनुवादित करून घेतली आहे)

मी तुमच्याच बाजूने आहे, शहिद झालेल्या जवानांच्याच बाजूने आहे, आणि हो, आपण या भ्याड हल्ल्याचा बदलाही घ्यायला हवा पण… काही दिवसांनी हे सगळं शांत होईल, कारण मुळात आज बदला घ्या, बदला घ्या म्हणून जो गोंधळ घातला जातोय तो एक धंदा आहे. राजकीय पक्ष, साधारण जनता किंवा ओरडा करणारी मीडिया यापैकी कुणालाच एखादा हातपाय गमावण्याची वेदना काय असते हे कधीच समजू शकणार नाही.

एक सैनिक तिरंग्यासाठी आपले प्राण द्यायला कुठल्याही क्षणी तयार असतो, पण किती दिवस ? किती वर्षे ? आपण ही सगळी सिस्टीम सुधारण्याचा प्रयत्न करणार आहोत की नाही ? आज सकाळी मी झी टीव्हीवर एका चर्चेसाठी गेलो होतो, तेव्हा मीडिया एका सैनिकाचा किती आदर कळते हे मला कळालं, आम्हाला बदला पाहिजे हे ओरडणाऱ्या टीव्ही अँकरला मी लॉजिक सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा, ती म्हणाली की “तुम्ही पुलवामा चे फोटो पाहिले नसतील म्हणून तुम्हाला समजत नाही की बदला हेच एकमेव उत्तर आहे .. ” मी तिला सांगितलं की “जीव द्यायला मी आजही तयार आहे, पण काश्मिरी युवकांनी आत्मघाती हल्ला करणारा वकास कमांडो बनण्याऐवजी, लान्स नायक नाझीर वणी (अशोक चक्र, सेना मेडल प्राप्त) बनावं म्हणून आपण काही प्रयत्न करणार आहोत का ?? माझा पागल शेजारी माझ्या घरात घुसून माझ्या तरुणांना भडकावत असेल तर त्यात माझीही चूक असेलच ना ? काल चाळीस कुटुंब उध्वस्त झालीत आणि अजूनही होतील, जर सरकार या मुद्द्यावर गंभीर नसेल तर. तुम्ही बदला, बदला ओरडण्याआधी सैनिकांच्या कुटुंबीयांना त्यांच्याशिवाय जगता येईल का हे कधीतरी विचारून बघा.. पुढची पिढी तरी कदाचित एका वेगळ्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहिल आणि या प्रश्नाचं उत्तर शोधेल असं मला वाटतं.. तोपर्यंत ते हल्ला करणार, आपण प्रत्युत्तर देणार, मग ते पुन्हा हल्ला करणार.. अश्या कत्तली सुरूच राहतील.”

एखादा हातपाय गमावलेल्या जवानाला जेव्हा पेन्शन साठी कोर्टाचे दरवाजे ठोठवावे लागतात तेव्हा तुम्ही कुठे असता ? एखाद्या शहीद झालेल्या जवानाच्या पत्नीला जेव्हा पेन्शन साठी दारोदार फिरावं लागतं तेव्हा तुम्ही कुठे असता, एखाद्या जवानाची बॉडी सापडत नाही तेव्हा अधिकारी त्याच्या विधवेला पेन्शन पाहिजे असेल तर बॉडी दाखवा म्हणतात, तेव्हा तुम्ही कुठे असता. मी स्वतः माझ्या योग्य पेन्शन साठी सात वर्ष लढलोय.

देशातल्या सर्व कोर्टात शहीद जवानांच्या अश्या हजारो केसेस धूळ खात पडलेल्या आहेत, मी काही दिवसांआधी रक्षा मंत्र्यांना भेटलो, त्यांनी आश्वासन दिले कि या केसेस जानेवारी संपण्याच्या आत निकालात काढू, पण जानेवारी संपलाय आणि रक्षा मंत्र्यांची वचनबद्धताहि संपली आहे. सरकारला जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च म्हणजे बजेटवरचा भार वाटतो, विशेष म्हणजे रक्षामंत्री स्वतः एक महिला असल्या तरी त्यांना एका विधवेचं दु:ख समजून घ्यावंसं वाटत नाही.

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडचं (HAL) उदाहरण घ्या, तुम्हाला लोक मरायला, मारायला हवे असतात मात्र त्यांच्या जीवनाचा खेळ करू नका, भावनांचा वापर करून कुठेतरी फक्त वाहवाही मिळवू नका, आर्मीला आणि केंद्रीय पोलीस दलांना काय करायचं ते त्यांना ठरवू द्या.

अखेर तुम्हालाही मनात येईल ते बोलण्याचा अधिकार आहेच, सैनिक तर मरण्यासाठी असतो असं तुम्हाला वाटतं ना ?

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment