मायावती – अखिलेश नमले ? काँग्रेसला महाआघाडीत येण्याचे आमंत्रण

प्रियांका गांधी-वद्रा यांच्या राजकारणातील अधिकृत प्रवेशाने भारतातील राजकारणाला एक नवीन वळण आले आहे. प्रियांका गांधी यांच्या या प्रवेशाने कॉंग्रेसची बाजू अधिक बळकट होताना दिसत आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांच्यावर उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. यानंतर उत्तर प्रदेशमधीलदेखील राजकीय चित्र बदलताना दिसत आहे.

प्रियांका गांधी यांच्या प्रवेशाचा व त्यांच्या लोकप्रियतेचा परिणाम बघून बसपा-सपा यांनी कॉंग्रेसला महाआघाडीत येण्यासाठी प्रयत्न सुरु केलेले दिसत आहेत. या दोन्ही पक्षाच्या महाआघाडीत कॉंग्रेसला १४ जागा देण्याची बोलणी सुरु असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

१२ जानेवारी रोजी, समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टी यांच्या अखिलेश यादव व मायावती या दोन्ही नेत्यांनी या दोन पक्षात आघाडी झाल्याचे सांगत येत्या लोकसभा निवडणुका हे दोन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याचे सांगितले होते. उत्तर प्रदेशमधील एकूण ८० लोकसभा जागांपैकी हे दोन्ही पक्ष प्रत्येकी ३८-३८ जागांवर उमेदवार देणार असून अमेठी व रायबरेली या जागा कॉंग्रेससाठी सोडणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली होती. या घोषणेमुळे हे दोन्ही पक्ष कॉंग्रेसशी महाआघाडी करणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.
राहुल गांधी यांनी या दोन्ही नेत्यांना आघाडीच्या चर्चेसाठी तयार असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते, परंतु प्रियांका गांधी यांच्या या राजकीय प्रवेशाने उत्तर प्रदेश मधील देखील कॉंग्रेसची बाजू अजून मजबूत झाल्याचे दिसून येते.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कॉंग्रेसला या महाआघाडीत कमीतकमी तीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज प्रियांका गांधी यांच्या लखनौ मधील रोड शोला मिळत असलेला प्रतिसाद हा राजकारणाचे चित्र स्पष्ट करत आहे. या रोड शो मध्ये प्रियांका गांधींसमवेत राहुल गांधी व ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित आहेत.

आमच्या सर्व अपडेट्स व्हाट्सएॅप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा .

Leave a Comment