मोलमजुरी करून जगणाऱ्या तरुणाला बनवलं उत्तर प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष

तब्बल पाचशे जणांची जुनी उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटी रद्द करून प्रियांका गांधींनी आज नवीन कमिटीची घोषणा केली, एकेकाळी रोजमजुरी करून जगणारा तरुण ओबीसी नेता अजय कुमार लल्लू यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षपदी आज करण्यात आली.

अजय कुमार एक लढवय्या नेता म्हणून प्रसिद्ध आहेत, कधी दलितांच्या हक्काचे लढे उभार, कधी उसाला चांगला भाव मिळावा म्हणून आंदोलन कर तर कधी पाणीवाटपावर मोर्चा काढ असं सतत आंदोलन करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांना धरना कुमार ही म्हटलं जातं.

2007 सालची गोष्ट आहे, अजय कुमार अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे होते, त्यांचं प्रभावी भाषण ऐकून मागे उभी असलेली एक म्हातारी म्हणाली की

‘ई बार त ना, पर अगली बार बेटा विधायक बनबे.’

म्हणजे यावेळेस शक्य नाही, पण हा पोरगा पुढच्या वेळेस आमदार बनेल, अन झालंही तसंच … काही हजार मतांनी अजय कुमारांची आमदारकी गेली, राजकारण सोडून अजय कुमारांना पोट भरण्यासाठी दिल्लीची वाट धरावी लागली, तिथं त्यांनी मजूर म्हणून काम केलं, तिथूनही त्यांचं लक्ष कुशीनगरच्या राजकारणाकडे लागलेलंच होतं. पुढे कुशीनगर मधूनच काँग्रेस पक्षाने त्यांना लढण्याची संधी दिली अन ते आमदार झाले. आमदार झाल्यावर त्यांनी सतत सामान्य जनतेचे प्रश्न आक्रमकरित्या सभागृहात मांडले आहेत, म्हणूनच त्यांची नियुक्ती काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदि करण्यात आली होती.

अजय कुमार लल्लू यांच्या नियुक्तीसोबतच संपूर्ण प्रदेश काँग्रेस मध्येही 40-45 वयोगटातील तरुण लढवय्या नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, विधिमंडळ गटनेतेपदी आराधना मिश्र यांची नियुक्ती करण्यात आली असून ललितेशपती त्रिपाठी आणि इतर चार जणांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

.

Leave a Comment